आज्ञापत्रांतील - आरमार प्रकरण

रामचंद्रपंत अमात्य प्रणीत आज्ञापत्रावरून

आरमार प्रकरण

आरमार : एक स्वतंत्र राज्यांग

आरमार म्हणजे येक स्वतंत्र राज्यांगच आहे. ज्यास अश्वबल त्याची पृथ्वी प्रजा आहे, तद्वतच ज्याजवल आरमार त्याचा समुद्र. या करितां आरमार अवस्यमेव करावे.

आरमाराची बांधणी व सुसज्जता :
चालीच्या गुराबा बहुत थोर ना बहुत लहान यैशा मध्यम रितीनें सजाव्या. तैसीच गलबतें करावी. थोर बरसे, फरगात, जें वरियाविण प्रयोजनाचेच नव्हेत, यैसे करावयाचे प्रयोजनच नाहीं. कदाचित एकदोन सलाबतीमुलें केले तरी जे आरमार करावें त्यावरी मर्दाने मारक माणूस, भांडी, जंबुरे, बंदुखा, दारूगोली, होके आदिकरून अरमारी प्रयोजनी सामान यथेष्ट बरें सजुते करावे.

गुराबा - एक प्रकारची होडी, बरसे - मोठे व्यापारी गलबत, फरगात - एक प्रकारचे लढाऊ जहाज, सलाबत - मजबुती, भांडी - तोफा, जंबुरे - लहान तोफा, होके - दारूने भरलेले पेटारे, सजुते - सज्ज

आरमाराची व्यवस्था :

त्याचे प्रत्यक प्रत्यक सुभे करावे. दरसुभे यास पांच गुराबा, पंधरा गलबतें. करून द्यावीं. इतक्यास एक सरसुभा करावा. त्याचे आज्ञेंत सर्वानी वर्तावें. अरमारास तनखा मुलकांत नेमून द्यावा. पैदास्तीवरी नेमणूक सहसा न करावी. पैदास्तीचे नेमणूकेमुलें सावकारास उपद्रव होऊन सावकारी बुडते. बंदरे राहिली पाहिजेत. प्रयोजनिक वस्त ते परस्थलीहून आणावी तेव्हां येते. यैसें जाल्यामध्यें राज्याचा भ्रम काय उरला ? तैसेच जकाती आदिकरून हसीलही बुडाला ; लुटीमुलें गोरगरिबाचा सत्यानास होऊन आपरमित पापही बाढलें; आरमारकरीही बेलगाम होऊन मनःपूत वर्तों लागले: तरी नेहमी तनखा मुलकातून देणे घडते. तरी इतका आनर्गल प्रसंग न होतां कदाचित अरमारास सारा नेहमी तनखा कैसा अनकूल पडतो म्हणावें, तरी जितका अनकूल पडेल तितकेंच अरमार सजावें. सावकारी वाढवावी. सावकारीमुलें जकातीचा हसील होईल. तितक्यावरी कितेक अरमार करूं नये. या रीतीने अरमार सजीत सजीत सजावें. अरमारकरी याणी हमेषां दर्यात फिरून गनीम राखावा. जंजिरियाचे सामान व दारू वरचेवरी पाववीत जावी. येविसीं जंजीरकरीयाचा बोभाट हुजूर येऊं न द्यावा. सर्वकाल दर्यावर्दी गनिमांचे खबरीत राहून गनिमाचा मूलूख मारावा. हवी पालती घालोन गनिमाचे स्थलाचे लाग करावे.

पैदास्ती - उत्पन्न, हसील - प्राप्ती, लाग करावे - हल्ला करावा

व्यापारी जहाजासंबंधीचे धोरण :

दर्यांत कौली सावकारी तरांडी यांची अमदरफ्ती करावी. कौली सावकाराचे वाटी जाऊं नये. त्यास कोण्हाचा उपद्रव लागत आसेल तरी तो परिहार करावा. गनिमाचे मुलकखेरीज विदेसीची गैरकौली यैसे सावकाराची तरांडी येतां जातां आली तरी ती परभारें जाऊ न द्यावीं . नयेभयें हाताखाली घालून त्यांचे दसोडीस हात न लावितां दिलासा करून बंदरास घेऊन यावे. बहुता प्रकारे त्यांणी व मुलूकगिरीचे कारभारी याणी जाऊन त्यांचे समाधान करावें. लाकडे, पाणी घेतील ते घेऊन द्यावे. नारलांचे शाहलीं आदिकरून जो त्यास जिनस पाहिजे असेल तो विकत अनकूल द्यावा. याविरहित आणखी खरेदी फरोख्त आत्मसंतोषें करितील, तो अल्पस्वल्प जकात घेऊन सुखरूप करू द्यावा. थोर मनुष्य सावकार कोण्ही असला तरी त्याचे योग्यतेनरूप दिवाणचे तर्फेने त्याची थोडी बहुत मेहमानी करावी. तो खर्च दिवाणातून मजरा घ्यावा. कोण्हे एक प्रकारें त्या परकी सावकारास सौख्य दिसे, माया लागे, राज्यांत आमदरफ्ती करीत, असें करावें. गनिमाचे मुलकातील सावकारी तरांडी दर्यात आसल्या, कस्त करून घ्यावी, घरून बंदरास आणावी. मालात काडी इतकई तसनस न करितां तमाम माल जप्त करून महालाचे कारकुनानी व आरमारकरी यांणी हुजूर लेहून पाठवावे. आज्ञा होईल तैसी वर्तणूक करावी.

कौल - अभयपत्र, परवाना, आमदरप्ती - येण्या जाण्याची मुभा, तरांडी - मोठे जहाज

आरमारी युद्ध :

आरमारास व गनिमास गांठ पडोन जुंझ मांडले तरी सर्वांनी कस्त करून येक जमावें गनीम दमानी घालून जुंझावें. वारियाचें बलें दमानी न येतां आपण दमानी पडलों, आपले गलबत वारियावरी न चाले यैसें जाहलें, तरी कैसेही आपले बल असो त-ही गनिमासी गाठं न घालितां, गांठ तोडीत तोडीत आपले जंजिरियाचे अश्रयास यावें, तरंडियास व लोकांस सर्वथा दगा होऊं देऊं नये. आपणास राखून गनीम घ्यावा. गनीम दमानी पडोन हरीस आला, जेर जाला, तरी येकायेकी उडी घालों नये. दुरून चौगीर्द घेरून भांडियाचा मार देत आसावे. दगेखोर गनीम आपण जेर जालो यैसे जाणून दगाबाजीनें कौल घेतो, म्हणोन जवल बोलाऊ नये. आपल्याजवळ बोलविल्यानें पायाळास आगी टाकून तरांडे जाया करितों. याकरिता त्याचा विश्वास न मानिता कौलास आला तरी दुरूनच कौल देऊन त्याचेच बतेल्यावरून सरदार देखील लोक आपणाजवळ आणावे. मग त्याचे तरांडेवरी आपले लोक चढवावे. नाही तरी मालबिसातीची तमा न धरितां भांडियाचे माराखालें तरांडे फोडून सलाबत पाडावी.

आरमाराची छावणी :

आरमाराची छावणी करणे ते दर्या तुफान होणार तों आठ पंधरा दिवसी आगोधर करावी. तेही प्रतिवर्षी येकाच बंदरीं आथवा हरयक जंजिरियाखाली किंवा उघड्यामानी सर्वथा न करावी. प्रतिवर्षी येक्याच बंदरी छावणी केल्यानी आरमाराचे लोक बारगल ताकीद केली तरी कांही येक मुलकास उपसर्ग होतच आहे. तो येकाच मुलकास होणार यैसें होऊं न द्यावे. उघड्यामानी आरमाराची छावणी केली तरी छावणी करणे ते आरमार धड्यावरी वोढावे लागते, वरती छावणी, तशामधे दगेखोर, चोरीछपीने तात्काळ अग्नीचा दगा करणार. यैसेंही होऊं न द्यावे. केवल किल्याचेच बंदरात छावणी करावी तरी आरमारचे मनुष्य बहुवस प्रायशा अविंध आणि उन्मत, यरवादे बोलचालीमुले कचकलागत होऊन लोक जाया होणार, कदाचित परस्परें संकेतस्थलांत फितवा होऊ शके, हे बरें नव्हे. याकरितां आरमारची छावणी करणे ते प्रतिवर्षी नूतन बंदरी, ज्या बंदरास मोहारी किला, किल्याचे दहषतीने गनीम खाडींत शिरों न शके आथवा आडखाडी, यसे खाडीत आरमारची छावणी करावी. तेही सारे आरमार येकाच जागा न ठेवावे. जागा जागा छावणीस ठेवावें. रात्रीस खाडीतील गस्त व खुष्कीची गस्त आरमारासभोवती करवीत जावी.

सुभेदारांनी आपला कबिलादेखील दोन महिने त्याच जागा ठेऊन आरमाराची रातबिरात चाकरी करून, लागेल ते सामान तेविषई हुजूर लेहून विल्हे करून घ्यावी. मुलकांत आवाडाव सर्वथा होऊ न द्यावी. आरमारास तख्ते, सोट, डोलाच्या काठ्या आदिकरून थोर लाकूड आसावे लागते. ते आपले राज्यात आरण्यामध्ये सागवानादि वृक्ष आहेत त्यांचे जे आनकूल पडेल ते हुजूर लेहून हुजूरचे परवानगीने तोडून न्यावे. याविरहित जें लागेल तें परमुलकीहून खरेदी करून आणवीत जावें. स्वराज्यातील आंबे, फणस आदिकरून हेही लाकडे आरमारचे प्रयोजनाचीच. परंतु त्यांस हात लाऊ न द्यावा. काये म्हणोन की ही, झाडे वर्षा दों वर्षांनी होतात यैसे नाही. रयतेने ही झाडे लाऊन लेकरासारखी बहुत काल जतन करून वाढविली असता, ती झाडें तोडिलियावरी त्यांचे दुःखास पारावार काये आहे ? येकास दुःख देऊन जे कार्य करीन म्हणेल, ते कार्य करणारासहित स्वल्पकालेंच बुडोन नाहीसेंच होतें. किंबहुना धण्याचेच पदरीं प्रज्यापीडणाचा दोष पडतो. या वृक्षाच्या अभावें हानीही होते. याकरिता हे गोष्ट सर्वथा होऊं न द्यावी. कदाचित येखादे झाड, जे बहुत जिर्ण होऊन कामातून गेले आसेल, तरी त्याचे धण्यास राजी करून, द्रव्य देऊन, त्याच्या संतोषें तोडून न्यावे. बलात्कार रयतेवरी सर्वथा न करावा.

संदर्भ - "आज्ञापत्र" संपादक - रा. चिं, ढेरे